'सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं' लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरे यांचा ठाकरे सरकारला इशारा

लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते, ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? 

Updated: Jul 22, 2021, 02:42 PM IST
'सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं' लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरे यांचा ठाकरे सरकारला इशारा title=
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसंच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून बंदच आहे. मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार अशा हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्यांना तातडीने लोकलमधून प्रवास करु देण्याबाबत तातडीने पावलं उचलण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
 

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

 
जय महाराष्ट्र,
 
गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत.
 
मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरु आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? 
 
ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे, आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही. 
 
महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.
 
त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी*. विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन  लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील, आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल.
 
मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल. 
 
आपला,
 
राज ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना