मुंबईत मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', आदित्य शिरोडकर यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे संकेत

Updated: Jul 16, 2021, 10:04 PM IST
मुंबईत मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', आदित्य शिरोडकर यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाईही उपस्थित होते. 

मनसेतील एक महत्त्वाचा चेहरा शिवसेनेत दाखल झाल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर मुंबईतील युवक संघटनेवर पकड असणारा नेते पक्षात दाखल झाल्यामुळे शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 'आदित्य शिरोडकरजी यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली होती. यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार केलं होतं. यात उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे आदित्य शिरोडकर यांच्या सोडचिठ्ठीमुळे मनसेला मुंबईत धक्का असल्याचं बोललं जात आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि आदित्य शिरोडकर यांच्यात गेल्या वर्षी वादही झाला होता.