मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे.उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय MPSCने घेतला असून, आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
MPSCमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती.
मात्र निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील (open) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी 2020 मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते.