Western Railway Employees Run Over By Local Train: सिग्नल दुरुस्तीच्या कामादरम्यान लोकल ट्रेनने धडक दिल्याने पश्चिम रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकांदरम्यान घडली. या प्रकरणामध्ये आता पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. मरण पावलेल्या तिघांपैकी दोघांच्या कुटुंबियांना 40 लाखांची तर एकाच्या कुटुंबियांना 24 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल असं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे.
वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रेल्वेचे 3 कर्मचारी सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती करत होते. त्यावेळी एका भरधाव लोकल ट्रेनच्या धडकेमध्ये या तिघांचाही मृत्यू झाला. दुरुस्तीचं काम सुरु असताना लोकल येत होती. मात्र ही लोकल नेमक्या कोणत्या रुळावर येईल याचा अंदाज या तिन्ही कर्मचाऱ्यांना न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवलेंनी दिली. मृतांमध्ये 57 वर्षीय मुख्य सिग्नल नियंत्रण वासू मित्रा, 37 वर्षीय विद्युत सिग्नल तपासनीस सोमनाथ लांबतुरे आणि 37 वर्षीय मदतनीस सचिन वानखेडे यांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेने प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रत्येक कुटुंबाला 55 हजारांची मदत देण्यात आली आहे. तसेच पुढील 15 दिवसांमध्ये नियमांनुसार आर्थिक मदत केली जाईल असं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे. सोमनाथ लांबतुरे आणि सचिन वानखेडेंच्या कुटुंबियांना प्रत्येकी 40 लाख रुपयांची मदत केली जाईल. तर वासू मित्रा यांच्या कुटुंबाला 24 लाखांची मदत केली जाईल, असं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ते ज्या पोस्टवर कार्यरत होते त्यासाठी दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईनुसार पैसे दिले जाणार आहे.
सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीचे काम सुरु असताना त्या मार्गावर 'फ्लॅगमॅन' असणे आवश्यक होते. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे 3 कर्माचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम रेल्वेचे जाळे विस्तारले असून तिथे प्रत्येक बाबाकडे आणि खास करुन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे असताना प्रशासनाकडून त्याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघटनेनं केला आहे. लोकल ट्रेनची वाहतूक सुरु असतानाच अनेकदा दुरुस्तीची कामं केली जातात. अनेकदा यामध्ये मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक चुकांमुळे अपघात होतात आणि कर्मचाऱ्यांना प्राणाला मुकावे लागते.