बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे 'अर्धशतक'

११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला होता. 

Updated: Jul 11, 2020, 06:53 PM IST
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे 'अर्धशतक' title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई:  कोरोना व्हायरसचा Coroanvirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या आक्रमक उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ५० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील १.७२ टक्क्यांवरुन १.३९ टक्क्यांवर आला आहे.

११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला होता. 'संसर्गजन्यता' तुलनेने अधिक असणाऱ्या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रापुढे मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक सुविधांसाठी आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक

सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण
झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर यासारख्या बाबी यथायोग्य प्रमाणात उपलब्ध असतील याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे.

विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

 

वैद्यकीय चाचणी, वैद्यकीय उपचार व खाटांचे विभागस्तरीय व्यवस्थापन
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांसह त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी वेळच्यावेळी होऊन त्यापैकी 'पॉझिटिव्ह' चाचणी अहवाल हे महापालिकेकडे २४ तासात उपलब्ध व्हावेत, तर यापैकी ज्यांना गरज असेल त्यांना मदत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात किंवा जम्बो फॅसिलिटी असलेल्या उपचार केंद्रात वेळच्यावेळी 'बेड' उपलब्ध व्हावेत, याविषयीचे सुव्यवस्थापन साध्य व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागस्तरीय 'वॉर रुम' कार्यान्वित करण्यात आल्या. या विकेंद्रीत व्यवस्थापनामुळे गरजूंना त्यांच्या परिसरानिकटच्या रुग्णालयात 'बेड' मिळण्याची शक्यता दुणावण्यासह तुलनेने अधिक लवकर उपचार सुरु होण्यास गती मिळाली. या नुसार करण्यात आलेल्या सुव्यवस्थापनामुळे आज महापालिका क्षेत्रातील अनेक उपचार केंद्रातील खाटा या सकारात्मकरित्या रिकाम्या आहेत.

मिशन झिरो आणि शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan)

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'कोरोना कोविड १९' ची रुग्ण संख्या शुन्यावर आणणे आणि यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची कणखरपणे व अभियान स्वरुपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. महानगरपालिकेच्या या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, जनसामान्य यांच्यासह सामाजिक संस्थाचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. 'कोरोना कोविड १९' विषाणू विरुद्धच्या युद्धामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांना यश येत असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी आता ५० दिवसांवर गेला आहे. मात्र, असे असले तरी ज्या भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. गरज असणा-या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कंटेनमेंट झोनची सुनियोजित अंमलबजावणी

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील जे परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले, त्याठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील नागरिकांच्या स्तरावर नियमितपणे जाणीवजागृती करणे, नागरिकांना यांच्या परिसरात बाहेर पडण्याची गरज भासू नये यासाठी यथायोग्य सर्व दक्षता घेण्यासही जीवनावश्यक बाबींची उपलब्धता त्याच परिसरात करून देण्याबाबतची कार्यवाही करणे इत्यादी बाबींची परिणामकारक अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.