Coronavirus: मुंबईला मोठा दिलासा; नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

गेल्या काही दिवसात याच कालावधीत येणारे आकडे हे शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असायचे. 

Updated: Apr 17, 2020, 04:23 PM IST
Coronavirus: मुंबईला मोठा दिलासा; नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट title=

मुंबई: देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, शुक्रवारी पहिल्यांदाच मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटताना दिसली. काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते आज दुपारपर्यंत संपूर्ण राज्यात कोरोनाचे केवळ ३४ नवे रुग्ण आढळून आले होते. यामध्ये मुंबईतील सहा आणि पुण्यातील २३ जणांचा समावेश आहे. 

लॉकडाऊन : पुण्यात भांडखोर नवऱ्यांना करणार क्वारंटाइन

गेल्या काही दिवसात याच कालावधीत येणारे आकडे हे शंभरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त असायचे. ४ एप्रिलनंतर दुपारी येणारा हा आकडा शंभरच्या घरात असायचा. मध्यंतरी हा आकडा २०० च्या आसपासही गेला होता. मात्र, आज केवळ ३४ रुग्ण आढळल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. 

मात्र, पुण्यातील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पुण्यात कोरोनाचे २३ नवे रुग्ण आढळून आले. पुण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे एकुण ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगावात आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२३६ इतकी झाली आहे.

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सरकारचा दिलासा

कालच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातीस कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावल्याचे सांगितले होते. यापूर्वी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागत होता. मात्र, आता हाच कालावधी सहा दिवसांपर्यंत वाढल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले होते.