'या' कारणाने आईने केली पोटच्या मुलीची हत्या, पोलिसांना सांगितलं 'मुलीने आत्महत्या केली'

पोटच्या मुलीची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या आईला मुंबई पोलिसांनी केली अटक

Updated: Jun 16, 2022, 07:18 PM IST
'या' कारणाने आईने केली पोटच्या मुलीची हत्या, पोलिसांना सांगितलं 'मुलीने आत्महत्या केली' title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : पोटच्या मुलीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या एका आईला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आईने आपल्या 19 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंधेरीतल्या पारशीवाडा परिसरामध्ये एका महिलेने आपल्या मनोरुग्ण मुलीची गळफास लावून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 19 वर्षाची मुलगी मनोरुग्ण असल्याने मुलीची देखरेख करणं कठीण झालं होतं. तिचा त्रास आईला पहावत नव्हता, तिला सांभाळणं कठिण होत असल्याचं कारणास्तव त्या मातेने आपल्या पोटच्या मुलीला संपवलं.

नेमकी घटना काय?
मुंबईतल्या अंधेरी पारशिवाडा इथून एका महिलेने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रुमला केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. पण तपासादरम्यान पोलिसांना ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि तपास सुरु केला.

आई-वडिल आणि तीन मुली असं ते कुटुंब आहे. यातील मृत मुलगी ही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 8 महिन्यांची असताना खाली पडल्याने तिच्या मेंदूला मार लागला आणि तेव्हा पासून तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. 

पोलिसांना हत्येचा संशय
मुलीच्या गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या पद्धतीवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा करून मुलीचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीने गळ्याभोवती गळा अवळताना जी गाठ बांधली होती ते पाहता पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मनोरुग्ण मुलगी अशा पद्धतीने गाठ मारू शकेल का? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्या आधारावर पोलिसांनी मुलीच्या आईकडे चौकशी सुरु केली. अखेर आईने आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.

का केली मुलीची हत्या?
मुलगी मनोरुग्ण असल्यामुळे तिची देखरेख करणं कठीण बनलं होतं.  त्यातच नवरा व्यसनाच्या आहारी गेला होता. घरी कामावणारी ती एकटीच होती. त्यामुळे नैराश्यातून मुलीची हत्या केल्याचं महिलेने सांगितलं. अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी महिलेला अटक केली आहे.