मुंबई: राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील परिस्थिती आता झपाट्याने बदलताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धारावीत दिवसाला कोरोनाचे ७० ते ९० नवे रुग्ण सापडत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांत धारावीतील नव्या रुग्णांचा आकडा २५ च्या पुढे गेलेला नाही. शनिवारी तर धारावीत केवळ १० नवे रुग्ण सापडले. याशिवाय, ३० मे नंतर धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आता हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
राज्यात २७३९ नवे कोरोना रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू
धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८९९ इतकी असून आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात धारावीतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग धडकी भरवणारा होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेने धारावीतील अनेक वस्त्या सील केल्या. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. याशिवाय, आरोग्य यंत्रणेकडून धारावीतील लाखो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या सगळ्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
दरम्यान, दादर आणि माहीम या परिसरांत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. दादरमध्येही शनिवारी १० रुग्ण सापडल्याने येथील रुग्ण संख्या ३८४ झाली आहे. तर माहीममध्ये आज १८ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या ६२४ झाली आहे.
सोमवारपासून बेस्ट बसेसमध्ये सामान्य लोकांनाही प्रवास करता येणार
मुंबईत जी/उत्तरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३३७२ करोनाबाधित आहे. त्याखालोखाल एल वॉर्डात २९७४, के/पूर्व २८४१, एफ/उत्तर २८३०, ई वॉर्डात २८११, के/पश्चिम २६७९, एच/पूर्व २५६८, एफ/दक्षिण २४००, जी/दक्षिण २३१५, एन २२७१, एम/पूर्व २२४६ आणि एस वॉर्डात २०८० रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या ३१ हजार ३८७ आहे.