मुंबईत प्लाज्मा थेरेपी केलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

 हा रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता.

Updated: May 1, 2020, 03:31 PM IST
मुंबईत प्लाज्मा थेरेपी केलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू  title=

मुंबई : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. अनेक संशोधकांकडून लस निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्लाज्मा थेरेपीमुळे एक आशेचा किरण दिसत आहे. पण मुंबईत प्लाज्मा थेरेपी होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

53 वर्षीय या रुग्णाचा मुंबईतील लीलावती रुग्णालयात 29 एप्रिल रोजी मृत्यू झाला. हा रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता. त्याला चार दिवसांपूर्वीच प्लाज्मा थेरेपी देण्यात आली होती. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाकडून प्लाज्मा घेऊन त्या रुग्णाला देण्यात आला होता.

रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला रुग्ण गेल्या 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात भरती झाला होता. त्या रुग्णाची तब्येत गंभीर होती. अनेक उपचार करुनही रुग्णावर कोणताच परिणाम होत नसल्याने त्याला प्लाज्मा थेरेपी देण्यात आली होती. 

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी,  ICMRच्या मंजुरीनंतर कोरोनावर उपाय म्हणून प्लाज्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात येत आहे. प्लाझ्मा थेरपीमधून रुग्ण बरे झाल्याचे अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत परंतु त्याचा उपयोग प्रायोगिकरित्या केला जात असल्याचं सांगितलं.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारांच्यावर गेला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 10, 498 इतकी झाली आहे. तर त्यापैकी एकट्या मुंबईत 7 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 1773 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.