मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसतेय. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देश देखील सज्ज झालाय. वांद्रे येथे १००८ बेडचे पहिले खुले रुग्णालय उपचारासाठी सज्ज झाले आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन आणि आरोग्य तपासणीची सुविधा देखील आहे.
हे देशातील पहिले खुले रुग्णालय आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता वांद्रे येथील बीकेसीमध्ये एमआयडीसी मैदानावर हे खुले रुग्णालय तयार करण्यात आले आहे. एकूण १००८ बेड बनवले असून प्रत्येक बेडच्या शेजारी ऑक्सिजन मशिन ठेवण्यात आली आहे.
मुंबईत सध्या काही सरकारी आणि काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन सेंटर देखील बनवण्यात आले आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला ७५०० बेड्सची व्यवस्था आहे. पण इथे दुसऱ्या आजाराचे रुग्ण देखील आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून हे रुग्णालय कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
देशात कोरोना बाधितांचा आकडा ७८००३ इतका असून २६२३५ रुग्ण बरे झाले आहेत. तर २५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २५९२२ इतका आहे. आतापर्यंत राज्यात ५५४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ९७५ जणांना आतार्यंत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशात कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो १३ पूर्णांक ९ दिवसांवर आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे. गेल्या २४ तासांत देशातल्या एकूण १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, असे ते यावेळी म्हणाले.