मुंबई : वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल यांचे २२९ कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने थकवल्यामुळे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावशक उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांना केवळ भरती केले जात असून इतर नविन रूग्ण भरती करून घेतले जात नाहीत. तसेच सध्या असलेल्या रुग्णांनाही डिस्चार्ज दिला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आश्वासन दिले असून उद्यापर्यंत निर्णय होईल, असे सांगितले.
औषधे, ड्रग्ज, ऑक्सिजनसह इतर वस्तूंचा पूरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची देणी देण्यासही निधी नसल्याने रूग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालय बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तर रुग्णालयातील १ हजार कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार थकीत असल्याने त्यांनीही उद्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, उद्यापर्यंत शिल्लक अनुदानाबाबत निर्णय होईल. जोकाही निधी पेंडींग असेल तो देणार असल्याचं आश्वासन महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे सोडवतील, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे. हे रुग्णालय बंद पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाह्यरुग्ण विभागाबरोबरच शस्त्रक्रिया विभागही हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया रुग्णालयात सध्या सुरू आहेत. स्वस्त दरात रुग्णसेवा मिळत असल्याने राज्यातील लोक या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, सरकारच्या निधीअभावी रुग्णाचे हाल होताना दिसत आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी औषधे द्यावी लागतात, त्यांचा मोठय़ा प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. औषधे आणि वैद्यकीय सुविधांची उपलब्धता नसताना वैद्यकीय उपचार कसे सुरू ठेवणार, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला होता. त्यामुळे नाईलास्तव रुग्णालयाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे रुग्णालच्या अधिष्ठाता शंकुलता प्रभू यांनी सांगितले.