कृष्णात पाटील, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : घाटकोपर पश्चिम इथं राहणा-या एका विवाहित महिलेने एका स्थानिक व्यक्तीच्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे या पीडित महिलेने संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांमध्ये चार महिन्यांत सातवेळा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून कठोर कारवाई झालेली नाही. म्हणून ही वेळ आल्याचा आरोप महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी केलाय.
गुरुवारी संध्याकाळी या महिलेनं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवानं त्वरीत उपचार मिळाल्यानं ती वाचलीय. तिला जीवन संपवण्यासारखी टोकाची परिस्थिती निर्माण करण्यात जेवढा हात तिला छेडणा-या,त्रास देणा-या व्यक्तीचा आहे, तेवढाच हात बघ्याची भूमिका घेणा-या घाटकोपर पोलिसांचांही आहे.
दोन मुलांची आई असणा-या पीडित महिलेने आणि तिच्या पतीनं विवेक मसूरकर या व्यक्तीच्या विरोधात घाटकोपर पोलिसांमध्ये सातवेळा एनसी आणि एकदा एफआयआर दाखल केलीय. परंतू प्रत्येकवेळी जुजबी कारवाई करून छेडणा-या व्यक्तीला सोडले जायचं. यामुळं त्याची भीड चेपली आणि त्यातूनच तो तिला सतत त्रास देऊ लागला.
या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिनं टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. घाटकोपर पोलिसांनी मात्र या प्रकरणी कॅमे-यासमोर बोलण्यास नकार देत योग्य ती कारवाई केल्याचा दावा केलाय. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप केलाय.
एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांनी गुन्हा तर सोडाच साधी तक्रारही दाखल करून घेतली नव्हती. तसंच पीडित महिलेचे स्टेटमेंटही घेतले नव्हते. 'झी २४ तास'ने विचारणा केल्यावर पोलिसांची धावपळ सुरू झाली. गुन्हा रोखण्याऐवजी गुन्हा घडण्याची वाट पाहणा-या पोलिसांनी किमान महिलांवरील अत्याचाराबाबत तरी संवेदनशील राहणं गरजेचे आहे.