Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास होणार 'फर्स्ट क्लास' रेल्वेचा मोठा निर्णय

एसी लोकलच्या तिकिट दरात 50 टक्के कपात केल्यानतंर आता मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट

Updated: May 1, 2022, 05:37 PM IST
Mumbai Local Train: मुंबईकरांचा प्रवास होणार 'फर्स्ट क्लास' रेल्वेचा मोठा निर्णय title=

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी  एक मोठी बातमी. मुंबई लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्यांना एकाच आठवड्यात रेल्वेकडून दोन मोठी गिफ्ट मिळाली आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुंबई एसी लोकलच्या (AC Local) तिकिट दरात  50 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर रेल्वेने आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई रेल्वे बोर्डाने मुंबईत याची घोषणा केली. मुंबई एसी लोकल आणि मुंबई लोकल फर्स्ट क्लास या दोन्ही तिकिटांचं भाडं आता पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. (First Class Ticket Fare Reduced By 50 Percent) 

लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन मानली जाते. मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. वाढत्या महागाईत लोकलच्या तिकीट दरातील कपात लाखो लोकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

मासिक पास दरात कोणताही बदल नाही
एसी लोकल आणि फर्स्ट क्लास तिकिटांच्या मासिक पास दरांमध्ये मात्र कोणताही बदल नाही. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके तिवारी यांनी ही माहिती दिली. प्रथम श्रेणी मासिक पासच्या किमती पूर्वी होत्या तशाच राहतील. सध्या ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या पहिल्या वर्गाच्या तिकिटाचा दर 140 रुपये आहे, तर मासिक पास 755 रुपये इतका आहे. आता एक वेळच्या प्रवासासाठी तिकीट दर 140 रुपयांवरून 85 रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच सुमारे पन्नास टक्के कपात करण्यात आली आहे.

याआधी एसी लोकल ट्रेनच्या तिकिट दरात कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती.  या घोषणेनंतर आता एसी लोकलमध्ये पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास 65 रुपयांऐवजी केवळ 30 रुपयांमध्ये करता येणार आहे.

मुंबईकरांच्या सुविधेसाठी एसी लोकल सुरू करण्यात आली. मात्र महागड्या तिकिटांमुळे मुंबईकरांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. वाढत्या उन्हाळ्यात एसी लोकलच्या तिकिटांचे दर कमी करण्याची मोठी मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने त्याचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.