Mumbai Local 63 Hours Mega Block Latest News: मध्य रेल्वेवरील विशेष 63 तासांच्या मेगाब्लॉकला आज मध्यरात्रीपासून म्हणजेच (गुरूवार मध्यरात्री) 12.30 वाजल्यापासून ठाणे स्थानकात सुरू झाला आहे. या मेगाब्लॉकमधील दुसरा टप्पा शुक्रवार मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात सुरु होईल. सीएसएमटी स्थानकातील डागडुजीच्या कामांसाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाबरोबरच बेस्टने विशेष सोय केली आहे. एसटी महामंडळाकडून 50 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेस्ट प्रशासनाकडूनही जादा फेऱ्या चालवण्या जाणार आहेत. बेस्टच्या 55 बसच्या 486 अधिक फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान, मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनूसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिली आहे.
मुंबईची लाइफलाईन असलेल्या रेल्वेचा वेग मंदावणार असल्याने रेल्वेच्या प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कुलाबा, वडाळा, भायखळा स्थानक, दादर आदी ठिकाणांहून 55 बसच्या 486 फेऱ्या जादा चालवल्या जाणार आहेत. कुलाबा बस स्थानकातून 12 जादा बसद्वारे 232 अधिक फेऱ्या चवल्या जाणार आहेत. तर इतर ठिकाणाहून 43 जादा बसच्या 254 अधिक फेऱ्या चवल्या जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बेस्टकडून निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.
अशा विशेष दिवसांमध्ये प्रवाशांकडून टॅक्सी तसेच रिक्षा चालकांकडून अधिक भाडे आकारण्याचे प्रकार घडतात. मात्र या मेगाब्लॉकदरम्यान जास्त भाडे आकारणे रिक्षा तसेच टॅक्सी चालकांना महागात पडू शकते. रिक्षा आणि टॅक्सीमध्ये प्रवाशांना न बसवणाऱ्या किंवा जास्त पैशांची मागणी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओची विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.