मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर केंद्र आणि राज्य सरकार ही साखळी तोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अशात मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलची प्रतिक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली आहे. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.
कोरोनाची दुसरी लाट येवू नये म्हणून नागरिकांनी प्रत्येक गोष्टीची खबरदारी बाळगली पाहिजे. यंदाच्या वर्षांतील नाताळ साधा नाही. दिवाळी, दसरा, गणपती या सणांवर देखील कोरोना व्हायरसचं सावट होतं. त्यामुळे नव्या वर्षातच लोकलबाबत विचार करू असं वक्तव्य आयुक्त इकबाल चहल यांनी केलं.
दरम्यान, गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
परिणामी, लोकल यंदावर्षी सुरू न करता नव्या वर्षी सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी घेतला आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येवू नये म्हणून खबरदारी बाळगली जात आहे. मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या देखील करण्यात येत आहेत.