उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई लोकलचा मालडब्बा...; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जेष्ठ नागरिकांचा लोकल प्रवास आता सुखकर होणार आहे. जाणून घ्या काय आहे कारण

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 19, 2024, 10:52 AM IST
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई लोकलचा मालडब्बा...; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय title=
mumbai local train senior citizen can travel from luggage compartment Mumbai local trains says HC

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक वेगवान व सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहेत. सकाळच्या वेळी लोकलमध्ये चढणे ही मोठी कसरत असते. चाकरमान्यांची इतकी गर्दी असते की इतरांना चढण्यासाठी जागाही उरत नाही. अनेकजण लोकणच्या दाराला लटकत प्रवास करतात. त्यामुळं जेष्ठ नागरिकांनाही लोकलमध्ये चढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वेने एक निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाहीये. यावरुन उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली होती. 

जेष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये एक राखीव डबा आहे. मात्र, या डब्यात दिव्यांग व इतर प्रवासीदेखील चढतात. त्यामुळं जेष्ठ नागरिकांना उभं राहून किंवा गर्दीतून प्रवास करावा लागतो. या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर उत्तर देताना रेल्वेने एका मालडब्याचे जेष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले होते. मात्र, अद्यापही याची अमलबजावणी झाली नाहीये. यावरुन उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. 

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने आता रेल्वे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करुन दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच, दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करुन दिला जाईल, असंही रेल्वे प्रशासनाने न्यायालयाला म्हटलं आहे. 

लोकलमधून दररोज 50 हजार पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक प्रवास करतात. मात्र, त्यांना बसण्यासाठी तर सोडा पण नीट उभं राहण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे म्हटलं होतं. सध्याच्या आसनरचनेत बदल करुन त्याची चाचपणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक डब्यात 7 आसने वाढवता येतील, असं रेल्वेने म्हटलं होतं. 

दरम्यान, मालडब्यात 90 टक्के सामान्य प्रवासी तर दहा टक्केच वाहतूकदार असतात. तसंच, लोकलच्या सामान्य डब्यात जेष्ठासाठी राखीव आसने असतात पण गर्दीच्या वेळी जेष्ठांना या डब्यांमध्ये चढणे शक्य होत नाही. अशावेळी राखीव आसनांवर तरूण बसतात. त्यामुळं कधी कधी वाद होण्याचीही शक्यता असते. मात्र, आता जेष्ठांसाठी नवीन डबा तयार होत असताना जेष्ठांचा लोकल प्रवास सुकर होणार आहे.