मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं वाचला प्रवाशांचा जीव; विरार-चर्चगेट वांद्रे स्थानकात येताच...

Mumbai Local News Today: मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. थोडक्यात दुर्घटना टळली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 27, 2024, 12:25 PM IST
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं वाचला प्रवाशांचा जीव; विरार-चर्चगेट वांद्रे स्थानकात येताच... title=
mumbai local train update motorman thwarts suicide attempt at Bandra

Mumbai Local News Today: मोटरमनच्या प्रसंगसावधानामुळं एका प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. होळीच्याच दिवशी चर्चगेट-वांद्रे लोकलच्या मोटरमनला एक भयानक अनुभव आला. मात्र, त्यांच्या प्रसंगावधानामुळं एका व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला आहे. काय घडलं नेमकं जाणून घ्या. 

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. पण त्याचबरोबर लोकलमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन हे गुन्हे थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. तर, लोकलखाली येऊन आत्महत्याही होत असल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार रविवारी होळीच्या दिवशी घडला होता. वांद्रे येथे चर्चगेट-विरार फास्ट लोकलच्या खाली एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मोटरमनच्या प्रयत्नाने या व्यक्तीचा जीव वाचला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार 9.22 चर्चगेट-विरार लोकल ट्रनचे मोटरमॅन हरीश ठाकूर यांनी रविवारी रात्री 9.44 च्या आसपास एका व्यक्तीला रेल्वे ट्रॅकवर पाहिले. वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरुन गाडी सुटल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती रेल्वे रुळावर झोपल्याचे निदर्शनास आले. तेव्हा गाडीचा वेग साधारण 30 किमी प्रति तास इतका होता. 

गाडीच्या समोरील ट्रॅकवरच एक व्यक्ती झोपल्याने ठाकूर यांनी जोरजोरात हॉर्न वाजवला. मात्र तरीही तो व्यक्ती काही केल्या रस्त्यातून बाजू व्हायला तयार नव्हता. तेव्हा ठाकूर यांनी गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकल वेगात असल्याने गाडीचा वेग कमी करणे खूप कठिण होते. खूप प्रयत्न करुन ठाकूर यांनी गाडीचा वेग कमी केला. 

ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला रेल्वे रूळांवर एक व्यक्ती झोपलेला दिसला. मी सातत्याने हॉर्न वाजवत होतो पण तरीही तो रस्त्यातून बाजूला होत नव्हता. शेवटी मी ट्रेन थांबवण्याचा विचार केला. ट्रेन थांबवून मी कंट्रोल रुमला अलर्ट केले. त्यानंतर वांद्रे येथून एका कर्मचारी आला आणि त्याने त्या व्यक्तीला बाजूला नेले. त्यानंतर लोकल जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला. 

मुंबई रेल्वेवरील आत्महत्येच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहे. 2023च्या आकडेवारीनुसार, आत्महत्येंच्या घटनांमध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. 2022 मध्ये ही संख्या फक्त 100 होती. एका वर्षात एकूण 121 व्यक्तींनी आत्महत्या करत आपला जीव गमावला आहे. यात 100 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. यापैकी 82 आत्महत्या मध्य रेल्वेवर तर 39 आत्महत्यांचे प्रकरणी पश्चिम रेल्वेवर नोंदवण्यात आले आले.