लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 14, 2024, 08:17 AM IST
लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन title=
mumbai local train update Rail commuters to protest against delays at Diva today on 14 august

Mumbai Local Train Update: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. गेल्या काही वर्षांपासून लोकलचा भार वाढला आहे. लोकलमध्ये गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गर्दीमुळं अपघाताच्या घटनाही घडत आहेत. लोकल फेऱ्या वाढवण्यात यावा यासाठी प्रवाशी संघटनांनी रेल्वे मंत्र्यांनाही साकड घातलं आहे. दिवा रेल्वे स्थानकावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) साठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेल्वे संघटनांनी 14 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. 

मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात वाढणारी गर्दी त्यामुळं दिवा रेल्वे स्थानकावरुन थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) साठी लोकल सुरू करण्यासाठी तसंच, कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा बडगा उचलला आहे.  १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता प्रवाशांचा काळ्या फिती वाटण्यात येणार आहेत. प्रवासी त्या फिती बांधून प्रवास करणार आहेत. 

दिवा स्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळं स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळं लोकलमध्ये चढण्यासाठी खूप कसरत करावी लागते. दिवा स्थानकातून लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात. दिवा स्थानकात सुमारे १.२६ लाख तिकीट विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे ६.६२ लाख रुपये आहे. मात्र, एवढी कमाई होत असून देखील दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेल्या नाहीत, असा आरोप प्रवाशी संघटनेने केला आहे.          

22 ऑगस्ट रोजी आंदोलन

22 ऑगस्ट रोजी सर्व रेल्वे प्रवासी संघटनांचे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी मुंबई लोकल रेल्वे प्रश्नांचा बळी देत आहे. मेल आणि एक्स्प्रेस मुळे रोजच उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेन मुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कळवा ऐरोली लिंक आणि ५ -६ मार्गिका सारखे महत्वाचे प्रकल्प वर्षानुवर्षे MRVC कडून रखडलेले आहेत . कुर्ला ठाणे कल्याण ५-६ मार्गिका तयार असूनही लोकलच्या मर्गिकेवर रात्रं दिवस मेल चालवल्या जात आहेत. लोकल रेल्वे वेळेवर चलवाव्यात ह्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे. २२ ऑगस्ट रोजी प्रवासी काळी फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करणार आहे.