विरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक

Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 14, 2024, 04:40 PM IST
 विरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या  हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक title=
mumbai local train update Ticketless Commuter Bites TC in Virar AC Train

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. हजारो-लाखो प्रवासी लोकलमधून प्रवासी करतात. अनेकदा काही प्रवासी विनातिकिटही प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवार करडी नजर ठेवण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. अनेकदा तिकिट तपासनीस हेदेखील प्लॅटफॉर्मवर उभे असतात. फुकट्या प्रवाशांकडून आकारण्यात आलेला दंडदेखील लाखोच्या घरात जातो. विरार लोकलमध्ये (Virar Local) फुकट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला टिसीने पकडले त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून एकच खळबळ उडाली आहे. 

विना तिकीट एसी लोकलचा प्रवास करणाऱ्या एका महिलेने टीसीने तिकिट विचारल्यानंतर टीसीचा चावा घेऊन पळ काढला आहे. चर्चगेट विरार ट्रेनमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. अथीरा सुरेंद्रनाथ केपी (२६) या महिला टीसी गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये तिकिट तपासण्याचे काम करत होत्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्या बोरीवली रेल्वे स्थानकातून विरार स्लो ट्रेन मध्ये त्या चढल्या आणि प्रवाशांचे तिकिट तपासू लागल्या. 

यावेळी आरती सुखदेव सिंग (३२) ही महिला प्रवाशी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. अथीरा यांनी तिला ३०० रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी आरती सिंगने अथीरा यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दरम्यान दोघांमधील वाद वाढला.त्यामुळे अथीरा यांनी आरती सिंगला पुढील कारवाईसाठी वसई स्थानकात उतरण्यास सांगितले. मात्र वसई स्थानक येताच आरती सिंगने संधी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ती धावू लागल्यावर अथीरा यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. यावेळी आरती सिंगने अथीरा यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. जखमी झालेल्या अथीरा यांनी मदतीसाठी पोलिसांना बोलावले. फलाट क्रमांक दोनवरील गस्ती कर्मचाऱ्यांनी आरती सिंगचा पाठलाग करून तिला पकडले

महिला टीसीने दिलेले तक्रारीनंतर वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरती सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे. 

आरती सिंग हिने चावा घेतल्यानंतर अथीरा यांच्या हातावर दाताचे ठसे स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतर तिला उपचारासाठी लगेचच रुग्णालयात नेले. या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी आरती सिंग हिच्याविरोधात आयपीसी सेक्शन 332.353, आणि 147अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अद्याप आरती सिंह हिला अटक केली नाहीये. मात्र, अशा गुन्हात साधारण सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. 

दरम्यान, लोकलमधून प्रवास करताना तिकिट काढूनच प्रवास करावा. प्रवाशांना तिकिट लगेचच उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाइन व्यवस्थाही करण्यात आली आहे. युटीएस अॅपनेही तुम्ही तिकिट काढू शकता.