मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, तर रविवारी मध्य रेल्वेवरही खोळंबा; असं असेल लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 21, 2024, 06:49 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, तर रविवारी मध्य रेल्वेवरही खोळंबा; असं असेल लोकलचं वेळापत्रक  title=
Mumbai local train update WR Announces 10 Hour Mega Block On I Sept 22 To Sept 23

Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो शनिवारी-रविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेने दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे.  पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक तर रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, शनिवारी मध्यरात्री १२ पासून ते सकाळी १० पर्यंत १० तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असेल. त्यामुळे रविवारी लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. तसंच, कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरील ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील गाड्या उशिराने धावतील. 

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक 

मध्य रेल्वेवरील वेळापत्रक

कुठे : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांवर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे
कुठे : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवार मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर नेण्यात येतील. गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गिकेवरून धावतील. या लोकल राम मंदिर, मालाड, कांदिवली या स्थानकांवर थांबणार नाहीत. पहाटे ४.३० नंतर अंधेरी – विरारदरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद लोकल ब्लॉक कालावधी पूर्ण होईपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच चर्चगेट – बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल गोरेगावपर्यंत अंशत: रद्द करून गोरेगाववरून चर्चगेटकडे मार्गस्थ होतील. काही लोकल रद्द करण्यात येतील.