Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या (MADHA) मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी सोडत काढण्यात आली आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (YB Center) ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जदारांनी या घरांसाठी अर्ज केला होता. मात्र त्यातील 4 हजार 82 जणांचेच मुंबईतील घरांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हाडाच्या या घरांसाठी काही राजकारण्यांनी देखील अर्ज केला होता. मात्र त्यापैकी एका भाजप (BJP) आमदाराचे नशिब चमकले आहे.
म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून अर्ज केला होता. यासोबतच आमदार आमश्या पाडवी, गडचिरोलीचे माजी आमदार हिरामण वरखडे, भाजप आमदार नारायण कुचे यांनीही या घरांसाठी अर्ज केले होते. मात्र त्यापैकी आमदार नारायण कुचे यांना घराची लॉटरी लागली आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी सर्वसाधारण गटातून आणि लोकप्रतिनिधी गटातून पाच अर्ज केले होते. त्यातील एका ठिकाणी त्यांचा नंबर लागला आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील 1500 चौरस फुटांचे घर यंदाच्या मुंबई विभागीय लॉटरीत सर्वात महागडे घर होते.
म्हाडाच्या मुंबई सर्कलमधील ताडदेव परिसरातील क्रिसेंट टॉवरमध्ये साडेसात कोटी रुपयांचे आलिशान घर आमदार नारायण कुचे यांना लागलं आहे. नारायण कुचे यांनी म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण पाच अर्ज भरले होते. त्यातील दोन अर्ज हे क्रीसेंट टॉवरमधील संकेत क्रमांक 469 मधील सात कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपये किमतीच्या घरासाठी केले होते. त्यातील एक घर नारायण कुचे यांना मिळालं आहे.
दरम्यान, म्हाडाच्या 4083 घरांची जाहिरात 22 मे रोजी प्रसिद्ध झाली होती. ही लॉटरी मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे बांधलेल्या 4083 घरांच्या विक्रीसाठी होती. त्यासाठी तब्बल एक लाख 20 हजार 144 लोकांनी अर्ज केला होता. दुसरीकडे, पहाडी गोरेगाव येथील 2 हजार 683 आणि ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरांसह अन्य काही घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यामुळे या घरांच्या विजेत्यांना सोडतीनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देकार पत्रे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 45 दिवसांत विजेत्यांना घराच्या किमतीच्या 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास मुदतवाढ देत विजेत्यांना व्याजासह रक्कम भरावी लागेल. त्यानंतर मुदतवाढीतही रक्कम भरली नाही, तर घर रद्द होण्याची शक्यता असते.