मुंबई : मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसे नेते आणि मनसैनिक आक्रमक झाले आहेत. या नगरसेवकांनी ५ कोटीची ऑफर स्वीकारल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. दरम्यान आता मुंबईतले मनसेचे नेते सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोकण भवनला जाणार आहेत.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी हे नेते करणार आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर मनसेचे पालिकेतील ७ पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले. यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. शिवसेनाभवन आणि मातोश्रीसमोर होर्डिंग लावून मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता या फुटलेल्या नगरसेवकांना गट वेगळा स्थापण्याची परवानगी मिळू नये यासाठी मनसे नेते प्रयत्न करतील.
दरम्यान,रविवार पत्रकार परिषद घेऊन राज यांनी नगरसेवक फुटीवर मौन सोडले आहे. आता थेट गालावर टाळी देणार अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मनसेच्या त्या सहा नगरसेवकांना ५ कोटी देऊन शिवसेनेत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी उद्धव यांच्यासह शरद पवार आणि किरीट सोमैय्यांवरही तोंडसुख घेतलं
मनसेचे नगरसेवक फोडल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आता 'टार्गेट उद्धव' मिशन हातात घेण्यात आलं आहे. रविवारी सकाळी शिवसेना भवनसमोर शिवसेनेला डिवचणारं पोस्टर मनसैनिकांनी झळवलं. यानंतर अवघ्या काही तासानंतर मनसे कार्यकर्त्यांनी, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेरच होर्डिंग लावून शिवसेनेला आव्हान दिले. सोशल मीडियावरही या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत.