नवरात्रोत्सव-2021 साठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सवही साध्य़ा पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे.

Updated: Sep 30, 2021, 08:50 PM IST
नवरात्रोत्सव-2021 साठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी title=

मुंबई : कोरोनाचं सावट लक्षात घेता नवरात्रोत्सवावरही टांगती तलवार होती. महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यंदा नवरात्रोत्सवही साध्य़ा पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे.

- सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिकेचे परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी ऑनलाईन परवानगी यंत्रणा तयार केली आहे. यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.

- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि महापालिकेचे संबंधीचे घोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावे. घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणा-या देवीमूर्तीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

- देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तीकरिता 2 फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. 

- यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, जेणेकरून आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविंड १९ साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल.

- घरगुती देवीमुर्तींचे आगमन / विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क आणि स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. शक्यतो या व्यक्तींनी लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.