Mumbai News : उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बुलडोझर कारवाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. 21 जानेवारीला मुंबईतील मीरा रोडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र सरकारने बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी मीरा भाईंदर महानगरपालिकेने ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडवरील हैदरी चौकात सुमारे 15 इमारतींवरील अतिक्रमणे हटवली होती. मीरा रोडमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना थेट अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. मात्र महापालिकेने इतर कोणत्याही घटनेशी या कारवाईचा संबंध नसल्याचा दावा करताना ही नियमित कारवाई असल्याचं म्हटलं. अशातच आता मुंबईतही अशाप्रकारची कारवाई केली आहे.
मीरा रोडमधल्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेने दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील अतिक्रमणांवरही कारवाई केली. 24 जानेवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता या भागातील सुमारे 40 अतिक्रमणे हटवली. या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी मुंबई महापालिकेने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तिथे पाडण्यात आलेल्या सर्व बांधकामांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण असून, फूटपाथवरील जागा मोकळी करण्यासाठी ती पाडण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले.
इब्राहिम मोहम्मद मर्चंट रोडवरील जवळपास सर्व दुकाने पाडण्यात आली असून त्यात अनेक फेरीवाल्यांच्या स्टॉलचा समावेश आहे. बुधवारच्या बुलडोझर कारवाई झालेल्यांमध्ये काही प्रमुख व्यावसायिक दुकानांमध्ये नूरानी मिल्क सेंटर आणि सुलेमान उस्मान मिठाईवाला यांचा समावेश आहे. ही दुकाने 1930 च्या दशकातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाने सफाई मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व प्रभागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. फूटपाथ स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते हटवत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. "जिथे कारवाई करण्यात आली आहे, हे स्टॉल तात्पुरते होते आणि ते कायदेशीर नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना कोणतीही नोटीस बजावली नाही आणि बुधवारी थेट कारवाई करण्यात आली आहे," असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी विशिष्ट समुदाया विरुद्धच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. "बुलडोझर संस्कृतीला विरोध केला पाहिजे कारण ती घटनात्मक नाही. बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी बुलडोझर वापरणे ही घटनात्मक पद्धत नाही. सुनावणी आणि नोटिसा बजावण्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. अशा कृती नेहमीच विशिष्ट समुदायांना का लक्ष्य केल्या जातात," असा अतुल लोंढे यांनी केला आहे.
मीरा रोडमध्ये कारवाई
नया नगर परिसरामध्ये सोमवारी अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी संध्याकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नया नगरमधील चार इमारतींमधील दुकानांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.