मुंबई : शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आज सकाळपासून तपास यंत्रणांने धाडसत्र सुरु केलंय. शिर्डी देवस्थान ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax) छापे टाकलेत. आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. वांद्रेतील भाभा हॉस्पिटलच्या मागे राहुल कनाल राहतात. त्यांच्या घरावर आयकर विभागाकडून पहाटेपासून छापे टाकण्यात आलेत.
राहुल कनाल हे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात, ते शिवसेनेचे पदाधिकारी असून युवासेनेच्या कोअर टीमचे सदस्यही आहेत. तसंच श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त पदही त्यांच्याकडे आहे.
संजय कदम यांच्या घरावरही छापे
दुसरीकडे अनिल परब (Anail Parab) यांचे निकटवर्तीय संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या अंधेरीतील घरावरही आयकर विभागाचे छापे पडलेत. सकाळी पाच वाजल्यापासून आयकर विभागाच्या टीमकडून छापेमारी सुरुय. शिवसेना पदाधिकारी संजय कदमांच्या घराबाहेर जमा झालेत.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपची प्रचार यंत्रणा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमण झाली आहेत, मुंबईत निवडणूक लागेल असं कळल्यावर भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली आहे. म्हणून अशा कारवाया सुरु झाल्या आहेत. केंद्रीय यंत्रणा या आता भाजपाच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. तपास यंत्रणा आणि भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज संजय राऊत कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधीच आयकर विभागाने धाडसत्र सुरु केल्याने खळबळ उडाली आहे.