Mumbai News : सात बेटं मिळून तयार झालेल्या मुंबई शहराला मोठा समुद्रकिनारा (Mumbai Beaches) लाभला आहे तर, शहराला लागूनच असणाऱ्या नवी मुंबईपर्यंत खाडी क्षेत्रही लाभलं आहे. परिणामी शहरातील खाद्यसंस्कृतीमध्ये (Mumbai Food) बहुतांशी माशांचा समावेश पाहायला मिळतो. मुंबईमध्ये विविध समुदाय आणि त्यातही कोळी समुदायाची मोठी वस्ती असल्यामुळं शहरतील नागरिकांच्या आहातामध्ये मासे हा अविभाज्य घटक आहे. पण, आता हेच मासे ताटातून नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात असणाऱ्या स्थानिक मासेमारांना शहराला वेढलेल्या खाडी परिसरांमध्ये हमखास असंख्य मासे जाळ्यात सापडत होते. पण, आता मात्र मोठमोळ्या कारखान्यांमधील सांडपाणी आणि नागरी वस्तीतील सांडपाणीसुद्धा या खाड्यांमध्ये सोडण्यात येत असल्यामुळं खाड्यांना नाल्याचं रुप आलं आहे. परिणामी पाण्यातील जीवसृष्टीवर याचे थेट परिणाम दिसून येत असून एकदोन नव्हे तर तब्बल 48 प्रजातींचे मासे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार सर्वसामान्य मुंबईकरांच्या ताटात दिसणारी मांदेली, अनेकांच्या आवडीच्या चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे, कालवे या आणि अशा अनेक प्रकारच्या मासळीचा यामध्ये समावेश आहे. अहवालातील आकडेवारीनुसार शहरातील खाड्यांमध्ये उपलब्ध मासळीचं प्रमाण 30 ते 40 टक्क्यांनी कमी झालं आहे. खाडी किनाऱ्यावर सातत्यानं वाढणारं प्रदूषण या साऱ्यास कारणीभूत ठरत आहे. ज्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये माशांच्या 48 प्रजाती नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागाला लागून मोठं खाडी क्षेत्र आहे. या खाडी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी गेल्या कैक वर्षांपासून सुरू आहे. पण, 1990 नंतर अनेक विकासकामं आणि सीआरझेड कायद्याअंतर्गत 500 मीटर पर्यंतच्या बांधकामांवरील बंधनांमध्ये आलेल्या शिथिलतेचे परिणाम धीम्या गतीनं या जीवसृष्टीवर दिसून आले.
माशांच्या प्रजननासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या भागांमध्ये फक्त चिखल आणि रासायनिक करचा साचला आहे. ज्यामुळं माशांना इथं अंडी घालता येत नाहीयेत. परिणामस्वरुप या प्रदूषणकर्त्यांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी आणि खाडी क्षेत्रातील गाळाचा उपसा करावा अशी मागणी पर्यावरण स्नेही संस्थांकडून केली जात आहे.