Mumbai News : मुंबईत गिरगाव चौपाटी येथे शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. गिरगावच्या निवासी इमारतीत लागलेली आग विझवण्यात दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर इमारतीत दोन मृतदेह आढळले. तर नऊ जणांना वाचवण्यात यश आले. मृतांमध्ये वृद्ध आई आणि मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आईला वाचवायला गेलेल्या मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
नलिनी शाह (82 वर्ष) आणि व हिरेन शाह (60 वर्ष) अशी मृत आई आणि मुलाचे नाव आहे. गिरगाव चौपाटी परिसरातील रांगणेकर मार्गावर असलेल्या गोमती भवन इमारतीत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली होती. तीन मजल्याच्या या इमारतीत व तिसऱ्या मजल्याच्यावर एक पोटमाळा काढण्यात आला होता. त्याच मजल्यावर एका घरात ही आग लागली होती. ही आग काही मिनिटांतच सगळीमध्ये पसरली. घराच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून नऊ जणांना इमारतीबाहेर काढले. त्यानंतर दहाच्या सुमारास आग भडकली. तेव्हा नलिनी आणि हिरेन शाह आगीत अडकल्याची माहिती समोर आली. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शाह यांच्या घरात प्रवेश केला. तेव्हा एक मृतदेह बेडवर तर दुसरा मृतदेह बाथरुमध्ये जळालेल्या अवस्थेत पडला होता. त्यानंतर दोन्ही मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले. पहाटे साडेतीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले.
या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या शाह कुटुंबातील नलिनी शाह नुकत्याच सैफी रुग्णालयातून परतल्या होत्या. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांचे नातेवाईक शाह यांच्या घरी आले होते. रात्री सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर काही वेळातच, इमारतीला आग लागली आणि नलिनी आणि हिरेन हे इमारतीमध्ये अडकले. बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत जळून मृत्यू झाला. हिरेन यांनी घरातील इतरांना पळून जाण्यास सांगितले आणि मी आईला घेऊन येतो असे सांगितले. मात्र आईला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचाही मृत्यू झाला, असे शाह यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले.
हिरेनच्या तीन मुलांपैकी एकाने पाईप वापरून तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून खाली उतरून पळ काढला. कुटुंबातील इतर तीन सदस्य इमारतीच्या अगदी जवळ असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीमध्ये फळी वापरून पळून गेले. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांचा जीव वाचला. मात्र नलिनी आणि हिरेन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.