Mumbai News : मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णयावर अखेर गृहखात्याने शिक्कामोर्तब केलं आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. सरकारतर्फे अशा प्रकारची भरती करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने (Maharashtra State Home Department) हा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलिस दलात सध्या मनुष्यबळ कमी पडत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने 3 हजार कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा महामंडळा मार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. नवीन पोलीस भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून ही गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
काही दिवसांवर नवरात्र उत्सव,दिवाळी, नाताळ हे सण आले आहेत. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करावा लागतो. यासाठी मुंबई पोलीस दलात ही भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या जवानांची भरती करण्यात येणार आहे. हे भरती केलेले जवान 11 महिने किंवा भरती होईपर्यंतच्या कालावधी असेल तितक्याच काळापुरते मुंबई पोलीस दलात कर्तव्यावर तैनात असतील. त्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षा महामंडळात सेवा द्यावी लागणार आहे.
यासाठी सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी कंत्राटी पोलीस भरतीचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात कंत्राटी भरती करण्यात येणार नाही असे सांगितले होते. सुरक्षा महामंडळातील जवान ज्या आस्थापना आहे त्यांना सुरक्षेसाठी देत असतो तसे पोलीस दलासाठी हे जवान देण्यात येतील असे सांगितले होते.