मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही

कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही

Updated: Jan 24, 2023, 09:32 PM IST
मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही

Mumbai Covid Update : मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. मुंबईत आज एकाही कोविड रुग्णाची (Covid Patient) नोंद नाही. मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच एकाही कोवीड रूग्णाची नोंद झाली नाही. सुमारे पावणे तीन वर्षानंतर म्हणजे कोवीड संकट आल्यापासून आज पहिल्यांदाच एकही रूग्ण सापडला नाही. 16 मार्च 2020 रोजी पहिल्या कोवीड रूग्णाची मुंबईत नोंद झाली होती. मुंबईत आतापर्यंत एकूण 11 लाख 55 हजार 240 कोवीड रूग्णांची नोंद झालीय, तर 19747 जणांचा कोवीडमुळे मृत्यू झाला आहे.  

सध्या मुंबईत कोवीडचे केवळ 23 सक्रिय रूग्ण (Covid Actice Patient) आहेत, यापैकी दोन रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 86 लाख 96 हजार 180 कोवीड चाचण्या झाल्या आहेत

मुंबईत लसीकरण
मुंबईत आतापर्यंत 1,08,89,675 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 98,08,690 लोकांनी दोनही डोस घेतले आहेत. 14,48,606 लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पण मुंबईत जवळपास 83 लाख लोकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही.

कोविड सेंटर बंद
दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे  जम्बो कोविड केअर केंद्रं बंद करण्यात आली आहेत. , नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची 4 प्रमुख रुग्णालये, 16 उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मुंबईत कोरोनाची संख्या आटोक्यात असली तरी लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.