आताची मोठी बातमी! 1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 20, 2023, 02:47 PM IST
आताची मोठी बातमी! 1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा title=

Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) तोंडावर शिवसेनेतील  (Shivsena) आऊटगोईंग थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन (Shivsena Bhavan) इथं बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर  उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत विकासकामांच्या नावाखाली शिंदे सरकारनं महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. या उधळपट्टीविरोधात शिवसेना 1 जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. 

ठाकरे गटाचा विराट मोर्चा
येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा  (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका एकेकाळी साडेसहाशे कोटीत होती. शिवसेनेकडे कार्यभार आल्यानंतर ही ठेवी जवळपास 92 हजार कोटीपर्यंत पोहोचली. या ठेवींमधून कोस्टर रोड, जनतेच्या उपयोगाची कामं महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणत्याही कामांसाठी महापालिकेच्या पैशांचा वापर सुरु आहे. आतापर्यंत 9 हजार कोटी या एफडीमधून वापरण्यात आल्याचंही आपल्या कानावर आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. हा जनतेचा पैसा आहे, याचा हिशोब त्यांना जनतेला द्यावाच लागेल, याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. 

पंतप्रधान मदत निधीतल्या पैशांचं काय झालं याचा जाब विचारणारं कोणी नाही, पण महापालिकेच्या खर्चावर मात्र सर्वांचं लक्ष होतं, त्यात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कितीही काही झालं तरी गद्दार हे गद्दारच राहाणार, त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दाराचा शिक्का पुसला जाणार नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.