Mumbai News : मागील 10 वर्षांचा आढावा घ्यायचा झाल्यास मुंबई शहराचा चेहरामोहरा खऱ्या अर्थानं बदलल्याचं स्पष्ट झालं. शहरातील अनेक जुन्या वस्त्या, चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास करण्यात आला आणि शहरातील नागरिकांना या प्रकल्पांअंतर्गत नव्या, हक्काच्या आणि तितक्याच मोठ्या घरात जाण्याची संधी मिळाली. शहरातील बीबीडी चाळी आणि तिथं असणाऱ्या रहिवाशांचासुद्धा यामध्येच समावेश झाला आहे. शहरातील वरळी येथे असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम म्हाडाच्या मुंबई मंडळानं हाती घेतलं असून, आता पहिल्या दोन इमारतींचं बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरु आहे. यामध्ये एकूण 15593 रहिवाशांना येत्या काळात त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. या प्रकल्पातील बीडीडीच्या 33 इमारतींपैकी 12 इमारतींचं बांधकाम वेगानं सुरू असून त्यातील दोम इमारतींचं बांधकाम 2024 च्या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. किंबहुना दोन्ही इमारतींचं बांधकाम दिवाळीपर्यंतच पूर्ण होणार असून, साधारण डिसेंबरपर्यंत 550 घर धारकांना त्यांच्या घरांचा ताबा मिळणार आहे. प्राथमिक माहितीनुसार यंदाच्या वर्षअखेरीस बीडीडी चाळ इमारकत क्रमांक 30, 31, 36, 8, 9, 11 मधील रहिवाशी पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ठरणार आहेत.
मुंबईतील ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथे असणाऱ्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या तिन्ही ठिकाणी सुरु असणाऱ्या बांधकामांना वेग घेतला असून वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचं 60 टक्के काम आता पूर्णही झालं असून, आता अंतर्गत कामं सुरु असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
वरळी पोलीस मैदान येथे 8 विंगचं बांधकाम वेगानं सुरु असून, त्यातील डी आणि ई विंग आता शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळं डिसेंबर 2024 पर्यंत बीडीडी चाळीतील बऱ्याच रहिवाशांना स्वत:च्या नव्या आणि प्रशस्त अशा 500 चौरस फुटांच्या घरांमध्ये वास्तव्यास जाण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, सध्या बीडीडीच्या 34, 35, 37 आणि 38 क्रमांकांच्या इमारतींमधील रहिवाशी भाडं स्वीकारत तात्पुरती व्यवस्था असणाऱ्या भाडे तत्त्वांवरील घरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. येत्या काळात बीडीडी चाळींतील रहिवाशांना जसजसं बांधकाम पूर्ण होईल तसतसा त्यांच्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे. त्यामुळं आता रहिवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.