Ajit Pawar On Maha Vikas Aghadi Morcha : महाविकासआघाडीच्या नेत्यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. (Maharashtra Political News) परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केला आहे. दरम्यान, आंदोलन करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणारच, असा निर्धार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. महापुरुषांचा अपमान होऊनही राज्यपालपदावरुन कोश्यारींनी हटवलं नाही ना, मग आता विरोधक आंदोलक करणारच असं राऊत म्हणाले.
(हेही वाचा - महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे गटाची दिसणार ताकद )
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी सीमा वादावर भाष्य केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात समितीच्या माध्यमातून योग्य तो तोडगा निघावा असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय. मात्र सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्याने न्यायालयाकडेच बोट दाखवलं जाईल, असं पवार म्हणाले. केंद्राला काही शंका असतील तर त्यांनी 'दूध का दूध पानी का पानी' करुन घ्यावं, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राची बाजू योग्य पद्धतीने मांडण्यासाठी हरिश साळवे यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रात अनेक विषय गंभीर आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करत आहे. याते सरकारकडून समर्थन करण्यात येत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही मोर्चा काढू नये, असं सरकारला वाटत होतं तर मग राज्यपालांना हटवायला हवं होते. तसेच जे प्रवक्ते बडबडत आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. का केली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. मुंबई पोलिसांनी अजूनही या मोर्चाला कोणतीही लिखित परवानगी दिलेली नाही. मोर्चा अगदी दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई पोलिसांनी सूचवल्याप्रमाणे मविआच्या या मोर्चाची सुरुवात भायखळ्याच्या क्रुडास कंपनीजवळून केली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून लिखित परवानगीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती असून ती आज उशिरा किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय. शिंदे फडणवीस सरकार महापुरूषांचा अपमान करत असल्याचा आरोप करत वरळी बंद पुकारण्यात आलाय. आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वरळीत कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केलंय.