मुंबई: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांच्या हाती तब्बल १०० किलो फेंटानिल लागले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे १००० कोटींच्या आसपास आहे. ३१ डिसेंबरच्या तोंडावर केलेली ही कारवाई मुंबई पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाकोल्यातील चार व्यक्तींकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे अमली पदार्थ अमेरिकेला पाठवण्यात येणार होते. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, घनःश्याम तिवारी या चौघांना ताब्यात घेतले. या सगळ्यांची कसून चौकशी सुरु असून यामधून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या पार्टीजवर करडी नजर ठेवण्यात येईल. अटक केलेल्या चार जणांकडून त्यांच्या साथीदारांची आणि अड्ड्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एखाद्या औषध बनवण्याच्या कंपनीतून हे फेंटानिल विकत घेण्यात आल्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांनी या रसायनाचा साठा करण्याचा परवाना असल्याचा दावा केला. मात्र, त्यांना हा साठा नेमका कशासाठी केला आहे, याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या चौघांना १ जानेवारी २०१९पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.