मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं VIDEO शेअर करत उत्तर

नवनीत राणा यांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं VIDEO शेअर करत उत्तर

Updated: Apr 26, 2022, 02:47 PM IST
मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या आरोपांना मुंबई पोलिसांचं VIDEO शेअर करत उत्तर title=

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे, तसंच मागासवर्गीय असल्याने पाणी दिलं गेलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला असून यासंदर्भात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. 

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांनी  VIDEO शेअर करत उत्तर दिलं आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केलं आहे.  त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचं या व्हिड़िओत दिसत आहे. 

मुंबई पोलिसांना राणा दाम्पत्याला पोलीस स्थानकात कशी वागणूक दिली याचा पुरावाच मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्यांनी म्हटलंय आणखी काही बोलण्याची गरज आहे का? नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांची पोलखोल संजय पांडे यांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी काय केले होते आरोप
नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना पोलिसांनी अटक करुन भायखळा आणि तळोजा कारागृहात रवानगी केली. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध या पत्राद्वारे तक्रार केली आहे. खासदार राणांनी या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. 

काय आहे तक्रार?
"मला 23 एप्रिलला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मी 23 तारखेची रात्र पोलीस ठाण्यात काढली. रात्रभर मी पाणी मागितलं, मात्र मला पिण्यासाठी पाणी देण्यात आलं नाही", अशी तक्रार खासदार राणा यांनी पत्रात केली आहे. "पोलसांनी माझ्या जातीचा उल्लेख केला. मी खालच्या जातीची असल्याने मला पोलिसांनी त्या ग्लासात पाणी दिलं नाही, ज्या ग्लासात ते सर्व पाणी पितात. थोडक्यात मला माझ्या जातीमुळे मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलं",असं खासदार राणा यांनी म्हटलंय

"मला रात्री शौचालयाला जायचं होतं. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या या मागणीकडे ही दुर्लक्ष केलं. मला पोलिसांनी शिवीगाळ केली. तसेच आम्ही खालच्या जीतीतील लोकांना कर्मचाऱ्यांचं शौचालय वापरु देत नाही असेही मला पोलीस म्हणाले", असे गंभीर आरोप नवनीत यांनी लोकसभा अध्यक्षांना केलेल्या तक्रारीत केले आहेत.