दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी चॉपरनं वार करुन निघृण हत्या केलीये. त्यांच्या घराजवळच अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. आता याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
अशोक सावंत रात्री घरी परतत होते.. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांना उपचारासाठी तातडीनं श्री साई या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. या हत्येमुळे कांदिवली परिसरात तणावाचं वातावण आहे.
- ते त्यांच्या विभागात केबल व्यावसायिक होते. त्यांना खंडणीसाठी दोनवेळा धमकीचे फोन आले होते. त्याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती.
- अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात ते मध्यस्थ होते.
- त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
ठाकूर कॉम्प्लेक्समधील ऍव्हेन्यु हॉटेलमध्ये जेवून मोटारबाईकने घरी जात असताना मागून आलेल्या एका अनोळखी बाईक स्वाराने त्यांना हूल दिली. त्यामुळे सावंत आणि त्यांचा मोटारबाईक चालक रस्त्यावर कोसळले. सावंत यांच्यासोबत असलेला मोटारबाईक चालक हूल दिलेल्या मोटारबाईक स्वाराला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाला. तोपर्यंत मागून रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
२००२ ते २००७ आणि २००७ ते २०१२ दोनदा महापालिकेत नगरसेवक होते.
२०१२ ते २०१७ मध्ये त्यांची मुलगी नगरसेविका होती.
२०१७ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या मुलीने महापालिका निवडणूक लढवली. पण दोघांचाही पराभव झाला होता.