वाढत्या उन्हाळ्यातही मुंबईकरांना गारेगार प्रवास का नको? 'या' कारणाने चाकरमान्यांची एसी लोकलकडे पाठ

वाढत्या उन्हाळ्यातही का म्हणतायत मुंबईकर रेल्वे प्रवासी 'गारेगार प्रवास नको रे बाबा'

Updated: Mar 16, 2022, 02:14 PM IST
वाढत्या उन्हाळ्यातही मुंबईकरांना गारेगार प्रवास का नको? 'या' कारणाने चाकरमान्यांची एसी लोकलकडे पाठ title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानतंर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलही (Mumbai Local) आता प्रवाशांनी तुडुंब भरून धावू लागली आहे. बहुतांश लोकांचे दोन डोस झाल्याने लोकलमध्ये चाकरमान्यांची गर्दी वाढली आहे.

पण सध्या एका वेगळ्याच समस्येशी मुंबईकरांना सामना करावा लागतोय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पण या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.  एसी लोकल रेल्वेचा प्रवाशांना खास फायदा होत नसून रुळावर त्या रिकाम्याच धावताना दिसत आहे. याचा परिणाम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढत असून पुढच्या लोकलवर याचा ताण वाढताना दिसत आहे. 

लोकसभेत उपस्थित झाला मुद्दा 
मुंबईतील एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर कमी करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Sehwale) यांनी लोकसभेत केली आहे. प्रवाशांची प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत. यामुळे, प्रवाशांचा प्रतिसाद वाढून, रेल्वेचा तोटा देखील होणार नाही, असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

एसो लोकल सेवांमध्ये वाढ
एसी लोकल सेवांना अल्प प्रतिसाद मिळत असतानाही आणखी 34 एसी लोकल फेऱ्या वाढववण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पण जास्त भाडं असल्याने एसी लोकलला चाकरमान्यांचा अजिबात प्रतिसाद नाही. तरीही एसी लोकल वाढवण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. 

गेल्या चार वर्षांत वातानुकूलित (एसी) लोकल लोकप्रिय करण्यासाठी अनेक कल्पना राबविण्यात आल्या, मात्र प्रथम वर्ग श्रेणीच्या तिकीटदरापेक्षा जास्त दर असल्याने मुंबईकरांनी एसी लोकलला नापसंती दर्शवली असल्याचं दिसतं.

करोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. ऑगस्टपासून लसधारकांना लोकल प्रवासाची मुभा देत राज्य सरकारने सामान्यांना मोठा दिलासा दिला. मात्र, सर्वसामान्य तसंच प्रथम वर्ग श्रेणीतून प्रवास करणारा प्रवासी वातानुकूलित लोकलकडे फिरकला नसल्याचेच वास्तव आहे.