पुढचे 48 तास मुंबईवर धुरकं कायम राहणार

 सध्या थंडी अनुभवणा-या मुंबईकरांना शनिवारी सकाळी आणि रविवारीही धुरक्याचा सामना करावा लागला.

Updated: Dec 10, 2017, 08:53 PM IST
पुढचे 48 तास मुंबईवर धुरकं कायम राहणार  title=

देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : सध्या थंडी अनुभवणा-या मुंबईकरांना शनिवारी सकाळी आणि रविवारीही धुरक्याचा सामना करावा लागला. अनेकांना या धुक्यामुळे आनंद झाला असला तरी हे धुकं आजराला निमंत्रण देणार आहे.

शनिवार आणि रविवारची मुंबईकरांची सकाळ काहीशी वेगळी होती. दोन दिवस मुंबईत सर्वत्र दाट धुकं पाहायला मिळालं आणि याच धुरक्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागत होती. मात्र हे केवळ धुकं नसून धुरकं आहे.

मुंबईतल्या हवेची गुणवत्ता शनिवारी वाईट असल्याचं केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर प्रकल्पांतर्गत नोंदवण्यात आलं. आणि 48 तास हवेची गुणवत्ता खालावलेलीच राहण्याची शक्यताही वर्तवली गेली. वाढतं प्रदूषण या सगळ्याला जबाबदार असल्याचं मत या निम्मितानं पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्यानं धुलिकण हवेत तरंगत राहत आहेत. त्यामुळे धुरकं तयार होत असल्याचं हवामान खात्याच म्हणणं आहे. मात्र हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकारही बळावण्याची भीती आहे.

लहान मुलं, वयस्कर नागरिक, गर्भवती यांना याचा त्रास होऊ शकतो. येते काही दिवस अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण गरजेचं आहे.