शेअर बाजारात Black Wednesday, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले

Stock Market Closing Update: शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहिला मिळाली. सेन्सेक्स 676.53 अंकांनी पडला आणि 65,782.78 वर बंद झाला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहिला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. 

राजीव कासले | Updated: Aug 2, 2023, 04:54 PM IST
शेअर बाजारात Black Wednesday, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले  title=

Stock Market Closing, 2 August 2023 : शेअर बाजारात (Share Market) आज मोठी घसरण पाहिला मिळाली. आजच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex-Nifty) दोन्ही घसरणीसह बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 676.53 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरला आणि 65,782.78 अंकांवर बंद झाला आहे.  तर निफ्टी निर्देशांक 207.00 अंकांच्या म्हणजेच 1.05 टक्क्यांच्या घसरणीसह 19,526.55 वर बंद झाला आहे.

गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान
शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका गुंतवणकूदारांना (Investors)  बसला. गुंतवणूकदारांच जवळपास  3.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. BSE वर  लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3.56 लाख कोटी रुपयांनी घसरून 303.24 लाख कोटी रुपयांवर आले आहेत.

सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअरच्या यादीत केवळ चार कंपन्यांचे शेअर तेजीत होता. तर 26 कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आज नेस्ले इंडिया, एचयूएल, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांचे शेअर तेजीसह बंद झाले. नेस्ले कंपनीचा शेअर 1.15 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल ठरला आहे.

टाटाच्या शेअरमध्ये घसरण
आज घसरणाऱ्या समभागांच्या (Shares) यादीत टाटाच्या समभागांची सर्वाधिक विक्री झाली. टाटा स्टीलचs समभाग 3.45 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक खाली होता. याशिवाय टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, भारती एअरटेल, एलटी, अॅक्सिस बँक, कोटक बँक, आयटीसीसह अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले.

आज सर्वच क्षेत्रात घसरण झाल्याचं पाहिला मिळालं.  ऑटो सेक्टर, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, मीडिया, मेटल, आयटी, फार्मा,  प्रायव्हेट बँक, रियल्टी,  हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल, ऑइल अँड गॅस यासह सर्व क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण होतं.