मुंबई : रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.
एरवी रस्ते वाहतुकीने वडखळनाका मार्गे हे अंतर 125 किलोमीटर एवढे आहे. ते पार करण्यासाठी चार तास लागतात. ते आता अवघ्या 45 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशी ही रो-रो सेवा असेल. इंटिग्रेटेड पंटून अँड लिंक स्पॅन प्रकारची ही सेवा असणार आहे.
भारतातली ही सेवा दुसरी आहे. गुजरातेत पहिली सेवा सुरु झाली. दुसरी सेवा सुरू करण्याचा मान मुंबईला मिळालाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राला रो-रो सेवा नवी नाही. कोकणात तवसाळ ते जयगड बंदर आणि धोपावे ते दाभोळ या दरम्यानही रो-रो सेवा सुरू आहे. पण या दोन सेवांपेक्षा ही सेवा थोडी वेगळी असणार आहे.
भव्य तराफ्याचा यात उपयोग होणार असल्यामुळे भरती ओहोटीच्या पाण्याच्या पातळीनुसार ही बोट काठाला उभी राहील. त्यामुळे वाहनं बोटीतून काढणं सोपं असेल. बोटीत संपूर्ण वाहनासह प्रवास करून थेट मांडवा गाठणं या सेवेमुळे सहज शक्य होणार आहे. यामुळे मुंबई अलिबाग अंतर अवघ्या 45 मिनिटात पार करणं सहजशक्य असेल.