गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : तरुणाई म्हंटल्यावर मौज, मस्ती आणि हुल्लडबाजी. हे वयच मजा मस्ती करण्याच असतं. मात्र मस्ती कुठे करावी आणि कुठे नाही, यालाही काही मर्यादा असतात. याचंच भान न राखणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. रेल्वे प्लॅटफॉर्मवर 2 मित्र आपसात मस्ती करत होते. मात्र त्यातील एकाचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पडला. याचवेळी पाठून येणाऱ्या भरधाव रेल्वेने धडक दिल्याने या तरुणाचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (mumbai young men died in accident at kandivali railway station video)
हा सर्व अपघात पश्चिम रेल्वेवरील कांदिवली रेल्वे स्थानकावर गुरुवारी (21 जुलै) दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी घडला. हे मित्र रेल्वे स्थानकांवर मस्ती करत होते. यादरम्यान रेल्वे स्थानकाच्या कठड्यावर आल्यावर तोल जाऊन समोरून येणाऱ्या रेल्वेला धडक लागल्याचा प्रकार घडला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला. याप्रकरणी बोरिवली रेल्वे स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही. दरम्यान त्या मृत तरुणासोबत असलेला इतर तरुण कोण होते, याबाबतही पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे आता पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान असणार आहे.