लॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी

हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.

Updated: May 12, 2020, 05:18 PM IST
लॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी  title=

मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून देशभरातील अनेक शहरांसह मुंबईतील हवा स्वच्छ झाली आहे. हवेतील प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याने आकाश साफ आहे. हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे. मंगळवारी मुंबईतील कुलाबामध्ये हवेची गुणवत्ता AQI 42 इतकी नोंद करण्यात आली. हवेची ही गुणवत्ता चांगली मानली जाते.

हेलिकॉप्टरमधून मुंबईतील काही दृष्य टिपण्यात आली. या दृष्यांमध्ये हवा, पाणी, आकाश सर्व अतिशय साफ-स्वच्छ दिसत आहे. मुंबईतील वरळी सी-फेस, बांद्रा-वर्सोवा सी लिंक, वर्सोवा खाडी, मुंबई विमानतळ आणि जुहू चौपाटीवरील नजारा अतिशय सुंदर दिसतोय. लॉकडाऊनपूर्वी मुंबईतील हवा इतकी साफ, स्वच्छ कधी होती हेदेखील सांगता येणार नाही. मात्र आता लॉकडाऊनमध्ये हवेतील गुणवत्तेचा स्तर सुधारला आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी, हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने Centre-run System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR), लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचं सांगितलं होतं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. संपूर्ण ऑफिसेस बंद करण्यात आल्याने रस्त्यांवरील वाहतून जवळपास बंद आहे. याचा मोठा चांगला, सकारात्मक परिणाम आपल्या हवामान, वातावरण, पर्यावरणावर झाल्याचं पाहायला मिळतंय. 

काही दिवसांपूर्वी नासाकडूनही भारताचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. वैज्ञानिकांनी 2016 ते 2020 मधील छायाचित्रांद्वारे, भारतात धूळ - मातीचा, प्रदूषणाचा स्तर पूर्णपणे कमी झाल्याचं सांगितलं होतं.

 

नासाने शेअर केलेला भारताचा फोटो एकदा पाहाच - भारतात धूळ-मातीचा स्तर कमी; लॉकडाऊनदरम्यान 'नासा'कडून फोटो शेअर

दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्थर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरुन चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. पण लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. जगात प्रदूषणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र आता लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.