नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू - रामदास कदम

कोकणातील राजापूर येथे होणारा नियोजित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.  

Updated: Feb 20, 2019, 09:12 PM IST
नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू - रामदास कदम

मुंबई : कोकणातील राजापूर येथे होणारा नियोजित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प नाणार या ठिकाणी होणार नसेल तर मग कुठे हलवणार या प्रश्नावर कदमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कोकण किनारपट्टीवर हा प्रकल्प होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

नाणार प्रकल्प दुसरीकडे हलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी युतीच्या बैठकीत केल्यानंतर आता त्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक संपल्य़ानंतर नाणारसंदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक केसरकर हे मंत्री उपस्थित होते. नाणारमध्ये प्रकल्प उभारण्यासंदर्भात काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली. मात्र आता नाणार नेमका कुठे नेणार याबाबत आता उत्सुकता लागली आहे.