राज्य अधोगतीकडे चाललंय, नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Updated: Feb 18, 2020, 03:37 PM IST
राज्य अधोगतीकडे चाललंय, नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाणारबाबतदच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे . उद्धव ठाकरेंचं कोकणच्या विकासात काय योगदान आहे असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. हे राज्य अधोगतीकडे चाललंय. सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकानं सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे अशी टीका राणेंनी केली आहे. 

नाणारबाबत उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'शिवसेनेचे निर्णय मी घेतो. त्यानतंर ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. त्यामुळे जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. हा विषय बंद झालेला आहे, आता यावर बोलण्याचीही गरज नाही.'

याआधी भाजप आमदार नितेश राणे यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंचा हा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा आहे असं त्यांनी म्हटलं होतं. फक्त घोषणाबाजी होणार, कोकणवासीयांना काहीही मिळणार नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपला चिमटा काढला होता. 'मी स्वप्न दाखवत नाही, ती पूर्ण करतो. आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारं हे महाविकासआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आपणास जी विकास कामे करायची आहेत, त्या कामांबाबत आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीपुळे येथे म्हटलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत त्यांनी तिलारी प्रकल्प संवर्धन व राखीव करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्यांनी मसुरे (आंगणेवाडी) लघु पाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केले.