मुंबई : मराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण प्रश्नावर ६०५ अभ्यासक्रमांना ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार, असंही आश्वासन दिलं. तसंच मंत्रीमंडळची उपसमिती नेमून दोन ते तीन महिन्यांत आरक्षणा संदर्भातल्या निकषांचा आढावा घेणार असल्याचंही म्हटलं.
यानंतर, 'हिवाळी अधिवेशनामध्ये जसे शिष्टमंडळ आले तसेच आजही आले... हिवाळी अधिवेशना नंतरही सरकारने काहीही केलं नाही... सरकारच्या या निवेदनानानं कुणाचंही समाधान झालेलं नाही' असं म्हणत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली तर सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचं सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. 'मी एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे... सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे आहे... मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर याप्रश्नी सरकारची सकारात्मक मानसिकता आहे' असं राणेंनी म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
देशांत 52 टक्के आरक्षण आहे... आमची अपेक्षा एवढिच आहे की मराठा समाजाने जे केले त्याबद्दल औंदार्य दाखवावे, समाजात गरीबी आहे... हा मोर्चा शेवटचा ठरावा, त्रुटी दूर करुन आरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात यावे, असा आशावादही राणेंनी व्यक्त केला.