दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : गुजरात निवडणुकीत भाजपला घसघशीत यश मिळालं आणि भाजपच्या या यशावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गुजरातमधील भाजपच्या विजयाचं नेते नारायण राणे यांनी विश्लेषण केलं आहे.
‘गुजरातमध्ये भाजपचंच सरकार येणार हे मी या आधीच भाष्य केलं होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह प्रचारात होते, त्यामुळे भाजपचं सरकार येणं निश्चित होतं. राहुल गांधी एकाकी पडले, पक्षातून त्यांना साथ मिळाली नाही. पण त्यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिलाच पराभव होणं चांगलं नाही. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी १५० जागांचा दावा केला गेला होता. हे सर्वच पक्ष करीत असतात. प्रचंड विरोध असताना एकहाती सत्ता जिंकणं सोपे नव्हते.
या निकालातून भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल. जवळपास साडेतीन वर्षं केंद्रात सत्ता, २२ वर्षे राज्यात सत्ता असताना काठावरचे बहुमत मिळणं वाखणण्यासारखं नाही किंवा एवढं मोठं यश नाही. भाजपने या निकालातून शिकणं आवश्यक आहे.
नव्या सरकारचे काही निर्णय समाजात अप्रिय ठरले. नोटाबंदी, GST सारखे हे निर्णय होते. २२ वर्षे सत्ता असताना ज्यांना संधी मिळत नव्हती त्यांनी त्याचं भांडवल केलं. चारही बाजूनी विरोध आणि समाजात अप्रिय ठरलेले निर्णय त्यातून हा निकाल अभिप्रेत होता. या अप्रिय निर्णयांचा राहुल गांधी यांना फायदा झाला. मोदी-भाजप नको म्हणून लोकांनी राहुल यांना निवडलं. राहुल गांधी यांची ही लोकप्रियता या निवडणुकीपुरती मर्यादित राहील.
हार्दिक पटेल फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला नाही. पण त्यानं प्रचारात जान आणली. या निकालातून महाराष्ट्र भाजपनेही बोध घेण्यासारखं बरंच आहे.
शिवसेनेने गुजरातमध्ये ४१ जागांवर उमेदवार उभे केले. त्यांना १ टक्का मतेही मिळालं नाही. अपशकुन करणं हे शिवसेनेचे काम आहे. माझ्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, मी शिवसेनेला किंमत देत नाही.