close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. पण

Updated: Sep 2, 2019, 09:25 PM IST
शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले...

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. पण झी २४ तासशी बोलताना छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, आणि ही चर्चा आता थांबवा, याला पूर्णविराम द्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ हे भायखळा येथे आपल्या गणेश मंडळाच्या गणपती प्रतिष्ठापणासाठी आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी ही दिलेली प्रतिक्रिया चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी पुरेशी असल्याचं म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादीतील अनेक बडे दिग्गज नेते, भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याने, बड्या नेत्यांची पक्षप्रवेशाची नावं चर्चेत येत आहेत. यात छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आलं असलं, तरी आपण शिवसेनेत प्रवेश करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांना भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर, भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, ८ मे २०१९ रोजी मातोश्रीवर गेले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर पंकज भुजबळ यांनी भेट घेतली होती. छगन भुजबळ यांनीच पंकज भुजबळ यांना 'मोतश्री'वर जाण्यास सांगितल्याचं त्यावेळी बोललं जात होतं.

उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांच्यात त्यावेळी सुमारे 15 मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने, पंकज भुजबळ पेढे घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यास गेले होते. छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देखील त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला होता. एकंदरीत छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा अफवा ठरत असल्याचं दिसतंय.