मुंबई : कॅगच्या अहवालात फडणवीस सरकारवर ठेवलेल्या ठपक्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. कॅगच्या अहवालात फडणवीस सरकारने अफरातफर केल्याचं स्पष्ट झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घोटाळ्यांवर बोलण्याचा अधिकार नसल्याचा टोला अर्थमंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप त्यांनीच केले आणि चौकशीही त्यांनीच केली. त्यामुळे हे आरोप खोटे असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
पवारांवर केलेले आरोप खोटे आहे ते सिद्ध झालं आहे. देवेंद्र फडणीस अजित पवारांवर काही बोलू शकत नाहीत, कारण त्यांनी अजित पवारांबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नव्हतं. हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी अजितदादांबरोबर शपथ घेतली असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
ज्या सरकारने काही केलं नाही त्यांच्या काळातच या घटना झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चौकशी त्यांनीच केली. चौकशी त्यांच्या काळात पूर्ण झाली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर जी परिस्थिती होती ती एसीबीने न्यायालयात सादर केली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
कॅगने ओढलेले ताशेरे धक्कादायक आहेत. पैशाचं हवं तसं वाटप केलं, बेसुमार पैशांचे वाटप करताना भान ठेवलं नसल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला आहे. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्याचं भान या सरकारला नव्हतं, त्यामुळे तत्कालीन सरकारला ६५ हजार कोटी रुपये कुठे गेले हेच माहित नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमचं सरकार चौकशी सरकार नाही, आम्हाला कोणालाही जाणीवपूर्वक टार्गेट करायचं नसल्याचंही ते म्हणाले.