मुंबई : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या सुषमा आंधारे (Sushama Andhare) यांनी आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवबंधन बाधतांना सुषमा अंधारे भावुक झाल्या होत्या. त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय. सामान्यांमधून असामान्य घडवण्याचा निर्धार यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. या प्रवेश सोहळ्याचा शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेही उपस्थित होत्या.
सुषमा अंधारे झाल्या भावूक
शिवसेनेत मी नविन आहे, ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या माझ्यासाठी नेहमीत आदर्श राहिल्या असून पक्षात त्या मला आईसारख्या सांभाळून घेतील, तसंच शिवसेनेतील नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं सुषमा आंधारे यावेळी म्हणाल्या. तसंच आज गळे काढू रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामील व्हायचं असंही होणार नाही असा टोलाही त्यांनी शिंदे समर्थक आमदारांना लगावला.
शिवसेनेवर टीका का केली यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडले, आमचा एकच शत्रू असून त्याच्याशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करत असल्याचं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिलं.
'खऱ्याखुऱ्या शिवसेनेची पुर्नबांधणी करत आहोत'
यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खऱ्याखुऱ्या शिवसेनेची पुर्नबांधणी आपण करत असल्याचं म्हटलं आहे. एका वेगळ्या विचाराची व्यक्ती आणि त्यांच्या समर्थकांना शिवसेनेची भूमिका पटल्यानंतर त्या शिवसेनेत सामील झालेल्या आहेत. ज्यांना आपण मोठं केलं ती पलिकडे गेली, शिवसेनाप्रमुखांनी अनेक सामान्यांना असामान्य केलं. जे असामान्य झाली ती निघून गेली. पण आता परत सामान्यांना असामान्य घडवण्याची वेळ आली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
खऱ्याखुऱ्या शिवसेनेची पुर्नबांधणी आपण करत आहोत, अनेक जणांवर नव्याने जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांनाही आता संधी द्यायची आहे. त्यांच्यावरही संघटनेची जबाबदारी द्यायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केली.