'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'

'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार

Updated: Nov 23, 2019, 10:09 PM IST
'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार' title=

मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईतील पवईमध्ये असलेल्या 'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक वाय बी सेंटर येथे पार पडली. बैठकीमध्ये ४० आमदार असल्याचं समोर आलं होतं. या आमदारांच्या सुरक्षेसाठी त्यांनी 'रेनिसान्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात येणार आहे.

वाय बी सेंटर बाहेर एक बस बोलवण्यात आली आहे. या बसमधून राष्ट्रवादीचे आमदार 'रेनिसान्स हॉटेल'कडे कूच करतील. महत्त्वाचं म्हणजे बसमध्ये धनंजय मुंडे छगन भुजबळ देखील आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा असणार आहेत.  शरद पवार, सुप्रिया सुळे देखील वाय बी सेंटरमधून बाहेर पडले आहेत. 

तर राष्ट्रवादीचे काही आमदार दूर राहत असल्यामुळे त्यांना बैठकीत उपस्थित राहता आले नाही. ते आमदार थेट 'रेनिसान्स हॉटेल'वर पोहोचतील. तर अद्यापही राष्ट्रवादीच्या ५ आमदारांसोबत चर्चा न झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे पक्षातले काही आमदार त्यांच्यासोबत गेले होते.   

आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळालं आहे. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.

परंतु, त्यांची भेट फेल ठरली. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या नेत्यांनी माध्यमांसोबत कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी शरद पवार यांना पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.