दीपक भातुसे, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमूक पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा सगळ्याच पक्षाकडून दावा होत आहे. काही दिवसाआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळते आहे.
भाजपमध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे.
गयारामांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केलेला हा दावा जर खरंच ठरत असेल तर कोणते आमदार पुन्हा भाजपमधून राष्ट्रवादीत येतील याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.